कॅलिफोर्निया : भारताचे दुसरे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आपल्या तीन सहकाऱ्यांसह आज पृथ्वीवर यशस्वीरित्या परतले. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाजवळील समुद्रात ड्रॅगन अंतराळयानाचे लँडिंग यशस्वी झाले. सुमारे 18 दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर शुभांशू पुन्हा पृथ्वीवर परतले असून, हा भारतासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.
फाल्कन 9 रॉकेटद्वारे 25 जून रोजी फ्लोरिडामधील केनेडी स्पेस सेंटरवरून शुभांशू आणि त्यांच्या टीमने अवकाशात झेप घेतली होती. 14 जुलै रोजी दुपारी 4.45 वाजता त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीच्या दिशेने प्रयाण केले आणि 15 जुलैला यानाचे समुद्रात सुरक्षित लँडिंग झाले.
पुनर्प्रवेशानंतर वैद्यकीय देखरेख
सध्या सर्व अंतराळवीरांना समुद्रातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या शारीरिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अंतराळातील परिणामांमधून सावरण्यासाठी, पुढील 10 दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. त्यानंतर शुभांशू यांचं भारतात आगमन होण्याची शक्यता आहे.
शुभांशू – भारताचे दुसरे अंतराळवीर
1984 मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर, अंतराळात जाणारे शुभांशू हे भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले आहेत. त्यांच्या यशस्वी मोहिमेमुळे भारताच्या स्वदेशी अंतराळ स्थानकाच्या दिशेने होणाऱ्या तयारीला अधिक बळ मिळालं आहे.
60 हून अधिक प्रयोगांत सहभाग-
भारतीय हवाई दलात स्क्वाड्रन कमांडर असलेले शुभांशू शुक्ला यांना 2000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांच्या अंतराळातील 18 दिवसांच्या कार्यकाळात त्यांनी 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोगांत भाग घेतला, त्यात भारताचे 7 विशेष प्रयोग होते. विशेषतः मेथी आणि मूग या पिकांवर त्यांनी केलेल्या अभ्यासाला शास्त्रीय महत्त्व आहे.
आई-वडिलांची प्रार्थना आणि विश्वास-
शुभांशू यांचे पृथ्वीवरील आगमन यशस्वी व्हावे यासाठी त्यांचे पालक प्रार्थना करत होते. त्यांच्या वडिलांनी सांगितले, “अॅन्डॉकिंग सुरक्षित झाली याचा खूप आनंद आहे. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. लँडिंगही सुरळीत होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
दरम्यान शुभांशू शुक्ला यांची ही मोहीम भारताच्या अंतराळ इतिहासात एक नवा अध्याय ठरली आहे.