नागपूर: नागपूर शहरातील विविध भागात नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वाटर (ओसीडब्ल्यू)ने संयुक्त कारवाई करीत २८६१ अवैध नळ जोडणी रद्द केलेल्या आहेत. जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दहाही झोनमध्ये मनपा व ओसीडब्ल्यूच्या झोन चमुद्वारे ही कारवाई करण्यात आलेली आहे.
मनपा व ओसीडब्ल्यू द्वारे दहाही झोनमधील घरांच्या नळ जोडणींची तपासणी करण्यात आली. यामध्ये मीटरपर्यंत पाणी पुरवठा होण्यापूर्वीच नळ जोडणी केल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय अवैध नळ जोडणी, एकदा रद्द केलेली अवैध जोडणी पुन्हा सुरु करणे आणि एकाच ठिकाणी दोन नळ जोडणी असे प्रकार निदर्शनास आले. मनपा व ओसीडब्ल्यू चमूने झोनस्तरावर उपरोक्त विषयांची दखल घेऊन नळ जोडणी बंद करण्याची कारवाई केली. यात मीटरपर्यंत पाणी पुरवठा होण्यापूर्वीच नळ जोडणी केलेल्या २५५ जोडणींवर कारवाई करण्यात आली. याशिवाय १८८२ अवैध नळ जोडणी, एकदा रद्द केलेली अवैध जोडणी पुन्हा सुरु केलेल्या ११८ जोडणी आणि एकाच ठिकाणी दुहेरी नळ जोडणी असलेल्या ६०६ ठिकाणी अशा एकूण २८६१ नळ जोडण्यांवर कारवाई करण्यात आली.
दहाही झोनमध्ये सर्वाधिक ९२२ ठिकाणी कारवाई आशीनगर झोनमध्ये करण्यात आली आहे. झोनमधील भागाचा विस्तार आणि सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यादृष्टीने आशीनगर झोनचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. यात आशीनगर झोन-ए मध्ये ६१५ आणि आशीनगर झोन-बी मध्ये ३०७ असे एकूण ९२२ अवैध नळ जोडणी आढळून आले. या सर्व जोडणी बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
यापाठोपाठ सतरंजीपुरा झोनमध्ये ७६० ठिकाणी कारवाई करण्यात आली. दहाही झोनमधील कारवाईमध्ये धंतोली झोनअंतर्गत ३२८, लकडगंज झोन २३४, लक्ष्मीनगर झोन १६३, धरमपेठ झोन १३४, गांधीबाग झोन ९६, नेहरु नगर झोन ९५, मंगळवारी ८४ आणि हनुमान नगर झोनमधील ४५ ठिकाणी अवैध नळ जोडणी निदर्शनास आले. या सर्व अवैध नळ जोडणी बंद करण्यात आलेल्या आहेत.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.