मुंबई : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य सरकारने ‘राज्य उत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. ही माहिती आज विधानसभेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
सरकारने या उत्सवासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून, गणेशोत्सवावरील अनेक जुन्या निर्बंधांवर आता पुनर्विचार होणार आहे. यात वेळेची बंधने, ध्वनी मर्यादा आणि परवानग्यांमधील अडचणी समाविष्ट आहेत.
पुण्याच्या आमदारांची मागणी मान्य-
पुण्याचे आमदार हेमंत रासने यांनी आज विधीमंडळात मागणी केली होती की, गणेशोत्सवाला पंढरपूर वारीप्रमाणे अधिकृत राज्य उत्सवाचा दर्जा मिळावा. यावर सरकारने त्वरित प्रतिसाद देत ही घोषणा केली.
उत्सवासाठी विशेष नियोजन आणि सुविधा-
उत्सव काळात रस्ते, स्वच्छता, सुरक्षा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निधी वापरण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस प्रशासन आणि मंडळांशी समन्वय ठेवून नियोजन करण्यात येणार आहे.
शेलार म्हणाले की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे या परंपरेला आधुनिकतेची जोड देत, सुलभ व्यवस्था तयार करणे हा सरकारचा उद्देश आहे.