मुंबई : पूर्व विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितले की, नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून काम करत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्यानुसार एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. गरज भासल्यास तत्काळ मदत पोहोचवली जाईल.
दरम्यान, पावसामुळे नागपूर शहरासह परिसरातील अनेक नाले आणि नदीकाठच्या भागांत पाणी साचले असून, काही ठिकाणी बचावकार्यही राबवण्यात येत आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.