नागपूर, : पाणीपुरवठा संदर्भात जनतेचा विश्वास अधिक सुदृढ करण्यासाठी मनपा व ओसीडब्ल्यू द्वारे सुरू करण्यात आलेला ‘कंझ्युमर कनेक्ट’ उपक्रम निर्णायक ठरत आहे. 2024 मध्ये ओसीडब्ल्यू द्वारे ‘कंझ्युमर कनेक्ट’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पाणीपुरवठा सेवेशी संबंधित ग्राहकांच्या गरजा, समस्या आणि अभिप्राय समजून घेणे, त्यावर त्वरित उपाययोजना करणे व त्यांच्या समाधानात भर घालणे हा आहे.
या उपक्रमाअंतर्गत सर्व झोन मधील सेवा व्यवस्थापक (Service Point Managers – SPMs) व त्यांचे पथक थेट ग्राहकांच्या घरी भेट देऊन संवाद साधत आहेत. या संवादादरम्यान ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी ऑपरेशन अॅण्ड मेंटेनन्स (O&M) विभागासोबत समन्वय साधून कार्यवाही केली जाते. विशेष म्हणजे, या भेटी अशा भागात देखील केल्या जात आहेत जिथे कोणत्याही समस्या नोंदवल्या गेलेल्या नाहीत, जेणेकरून सर्व ग्राहकांना त्यांचे ऐकले जात आहे आणि त्यांना महत्त्व दिले जात आहे याची खात्री होत आहे.
या उपक्रमासाठी माहितीचा स्रोत मुख्यत्वे Hubgrade, कॉल सेंटर, आणि एसपीएम टीमच्या थेट भेटी आहेत. या प्रत्यक्ष संवादामुळे ग्राहकांचे अनुभव, प्रतिक्रिया आणि अपेक्षा प्रभावीपणे समजून घेता येतात आणि त्यामुळे तक्रार निवारण प्रक्रियाही अधिक प्रभावी व परिणामकारक होते.
या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्टे; ग्राहकांचा विश्वास निर्माण करणे, ग्राहक समाधानात वाढ करणे, ग्राहकांच्या गरजा समजून घेणे आणि अभिप्राय गोळा करणे आहे. हा उपक्रम प्रतिक्रियात्मक ते सक्रिय सेवा वितरणाकडे एक स्पष्ट बदल दर्शवितो, ज्याचा उद्देश केवळ समाधानासाठी नाही तर नागपूरच्या पाणी सेवांवरील ग्राहकांचा कायमस्वरूपी विश्वास निर्माण करणे आहे.
‘कंझ्युमर कनेक्ट’ या उपक्रमामुळे मनपा, ओसीडब्ल्यू आणि ग्राहक यांच्यातील संवादाचा दुवा अधिक बळकट होत असून, ग्राहकांमध्ये सेवा संदर्भातील समाधान व विश्वास वाढत आहे. पुढील काळातही हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मानस ओसीडब्ल्यू द्वारे व्यक्त करण्यात आला आहे.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.











