मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसचे आमदार आणि माजी अध्यक्ष नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही कारवाई केली.
प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर चर्चेच्या वेळी नाना पटोले यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या कथित विधानांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली. यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
नाना पटोले आक्रमक होत म्हणाले, “मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाहीत”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर वातावरण अधिकच चिघळलं.
कामकाज सुरू असताना नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आपल्या जागांवरून उठून थेट अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले. पटोलेंनी राजदंडालाही हात लावला आणि अध्यक्षांसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांची माफी मागण्याची मागणी सुरूच ठेवली. यामुळे सत्ताधारी आमदार संतप्त झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया देत सांगितलं, “विधानसभेचे माजी अध्यक्ष जर अध्यक्षांच्या अंगावर धावून जात असतील, तर हा संसदीय परंपरेचा अपमान आहे.”
याप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई करत नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केलं. मात्र, विरोधकांनी या निर्णयाला विरोध करत कामकाजावर बहिष्कार टाकला. माफीच्या मागणीवर विरोधी आमदार आक्रमक राहिले आणि घोषणाबाजी सुरू ठेवली. काही काळ सभागृहात गोंधळ सुरूच राहिला.