नागपूर : नागपूर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी मोठी कारवाई करत गांजाच्या तस्करीचा प्रयत्न उधळून लावत १०८ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शहरातील कळमना पोलिसांनी हायवेवर एक चकमकीसारखा पाठलाग करून केली. या प्रकरणात वाहनचालक आणि नागपूरमधील गांजाचा स्वीकारकर्ता अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशामधून गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विविध चौकांवर नाकाबंदी लावण्यात आली. त्याचदरम्यान, एक संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कळमणा पोलिसांनी पाठलाग करत वाहन अडवलं आणि गांजाच्या गठ्ठ्यांसह दोघांना अटक केली.
ही कारवाई कळमणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन थंडर” अंतर्गत पार पडली. ही मोहीम पोलीस आयुक्त रवींदर सिंगल आणि DCP निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत हुडकेश्वर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी २ किलो गांजासह दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई सायंकाळी ६.२० वाजता तपस्या चौक, मनेवाडा रिंग रोडवर करण्यात आली.
शेख अन्वर शेख जाफर (३०, रा. मिलन नगर) आणि मोहम्मद इमरान मो. मजीद (२७, रा. टोल चौकी, हैदराबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी २.०३ किलो गांजा, दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोळकर यांच्या नेतृत्वाखाली झोनल DCP रश्मिता राव आणि सक्करदरा विभागाचे ACP नरेंद्र हिवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.संपूर्ण शहरात “ऑपरेशन थंडर” अंतर्गत गांजाच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून अशा मोहीमा सातत्याने राबवण्यात येत आहेत.