Published On : Mon, May 26th, 2025
By Nagpur Today Nagpur News

महापालिका आयुक्तांची धक्कादायक कबुली — मॉलधारकांच्या फायद्यासाठी सीताबर्डीतील फेरीवाल्यांवर कारवाई

Advertisement

नागपूर: महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी अखेर कबूल केले की, सीताबर्डी मार्केटमधील फेरीवाल्यांवर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केली जाणारी कारवाई ही ना रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी आहे, ना वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी – ही कारवाई केवळ गोयल गंगा ग्रुपच्या मॉलधारक आणि त्यामधील दुकानमालकांच्या फायद्यासाठी केली जात आहे.

अन्याय निवारण मंचच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे त्यांनी सीताबर्डी व सक्करदरा परिसरातील फेरीवाल्यांसह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून आयुक्तांची आज भेट घेतली होती. चर्चेदरम्यान आयुक्त चौधरी यांनी थेट विचारले, “मॉलमध्ये दुकान घेणारे लोक वेडे आहेत का?” – तेही दोन वेळा. या प्रश्नातूनच त्यांच्या भूमिकेचा झुकाव नेमका कुणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट झाले.

Gold Rate
04 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,300 /-
Gold 22 KT ₹ 93,300/-
Silver/Kg ₹ 1,12,100/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धोटे म्हणाल्या, “ही केवळ फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई नाही, तर गरिबांवर, मध्यमवर्गीयांवर आणि सामान्य नागपूरकरांवर अन्याय आहे. सगळ्यांनाच मॉलमध्ये जाऊन महागडी खरेदी परवडत नाही. फेरीवालेच त्यांना स्वस्तात वस्तू उपलब्ध करून देतात.”

या कारवायांमुळे आयुक्त चौधरी आणि मॉल व्यवस्थापन यांच्यात साटेलोटा असल्याचा संशय अधिकच बळावत असून, प्रशासन मॉलधारकांच्या हितासाठीच काम करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अन्याय निवारण मंचने या पक्षपाती आणि गरिबांविरोधात चाललेल्या कारवाया तातडीने थांबवण्याची मागणी केली असून, फेरीवाल्यांचे हक्क अबाधित ठेवणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे धोरण राबवण्याची गरज अधोरेखित केली आहे. धोटे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, मॉल मालक आणि मॉलमधील दुकानदारांच्या फायद्यासाठी फेरीवाल्यांवर लक्षपूर्वक कारवाई करणाऱ्या आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Advertisement
Advertisement