नागपूर – उपराजधानी नागपूर आता ‘क्राईम सिटी’ म्हणून ओळख मिळवत आहे, असं चित्र निर्माण झालं आहे. रोजच्याच हत्यांमुळे शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यशोधरानगर येथील वनदेवी नगर चौकात एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाची कोयत्याने हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव सोहेल चाँद (२५) असून त्याच्यावर एमपीडीएसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सोहेल चाँद याचा परिसरातील शेख शादाब शेख शहजाद (२६), मोहम्मद सादिक अन्सारी (२९) आणि नौशाद शेख शहजाद (२७) या तिघांशी वाद झाला होता. याचा शेवट गुरुवारी दुपारी मृत्यूत झाला. वादाच्या पार्श्वभूमीवर या तिघांनी वनदेवी चौकात सोहेलवर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्घृण खून केला.
ही घटना सार्वजनिक ठिकाणी व दुपारच्या वेळेस घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचा व्हिडीओ काही लोकांनी मोबाइलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी काही तासांतच तिघाही आरोपींना अटक केली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल चाँद हा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करून ठेवत होता. त्याच्यावर ड्रग्स तस्करी, चोरी, मारहाण यांसारख्या अनेक गुन्ह्यांची नोंद होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर सोहेलने आरोपींच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिल्याने तणाव वाढला होता.
याच रागातून आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि भरदिवसा त्याची निर्घृण हत्या केली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून या घटनेने पुन्हा एकदा नागपूरमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.