मुंबई : तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांची मंत्रिपदाची वाट पाहणे संपले आहे. आज सकाळी 10 वाजता राजभवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार आहे. गेल्या महिन्यात धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे स्थान रिक्त होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला होता. 288 पैकी भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने 230 जागांवर विजय मिळवला होता. तर महाविकास आघाडी केवळ 50 जागांवरच आटोपली. या विजयानंतर डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना झाली. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मंत्री न झाल्यामुळे भुजबळ नाराज
सरकार स्थापनेनंतर नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात 39 आमदारांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र, त्यामध्ये छगन भुजबळ यांना संधी देण्यात आली नव्हती. भुजबळ हे पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ नेते असून त्यांनी यापूर्वीही उपमुख्यमंत्रीपदापासून विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मात्र, नवीन मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली ही नाराजी अखेर संपली असून, आज ते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.