रामटेक (जि. नागपूर): रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दुधाडा गावात पैशांच्या वादातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मृतकाचं नाव हर्षल धनराज कोटांगले असून त्याचा गावातील काही लोकांशी आर्थिक वाद सुरु होता. गुरुवारी रात्री सुमारे ११ ते १२ वाजेच्या सुमारास हर्षल आणि संबंधित आरोपी यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसान हर्षलवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात झालं. ही घटना त्याच्या घरापासून केवळ २० मीटर अंतरावर घडली.
गंभीर जखमी अवस्थेत हर्षलला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने मेवा हॉस्पिटलकडे हलवण्यात आलं. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर रामटेक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ठाणेदार आशाराम शेटे आपल्या पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. पोलीसांनी परिसर सील करून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.