नागपूर – गुन्हे शाखा युनिट 1 ने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मंगळवारी (13 मे) श्रध्दानंदपेठ येथील साऊथ अंबाझरी रोडवर इंडियन बँकेजवळ असलेल्या डिलाइट स्पा वर छापा टाकून तेथे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. ही कारवाई दुपारी सुमारे 4.15 वाजता करण्यात आली.
गुन्हे शाखेने या कारवाईत रिजूल अली इस्माईल अली (वय 26, रा. सोयगाव, आसाम) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार रहानुद्दीन सहाबुद्दीन (वय 26, रा. आसाम) सध्या फरार आहे. आरोपी स्पा सेंटरच्या आडून वेश्याव्यवसाय करून महिलांना जबरदस्तीने या धंद्यात ढकलत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईतून पाच महिलांची सुटका करण्यात आली. तसेच पोलिसांनी दोन मोबाईल फोन, रोख रक्कम 31,700 रुपये व इतर साहित्य असा एकूण 72,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी बजाज नगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत कलम 3, 4, 5 आणि 7 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर आणि सहाय्यक आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही मोहीम पोलीस निरीक्षक अमोल देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक सचिन भोंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने पार पाडली.