नागपूर :शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सुरू असलेल्या गांजाच्या अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत २४ जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात मंगळवारी संध्याकाळी हा छापा टाकण्यात आला. त्यावेळी स्नेहल लखनलाल चौरसिया नावाचा इसम दोन पिशव्यांत गांजा विकताना आढळून आला.
सततची हालचाल आणि व्यापाऱ्यांचा तक्रारींचा सूर-
या भागात अनेक दिवसांपासून संशयास्पद व्यक्ती दुचाकींवरून येऊन गांजाची खरेदी करत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला हा अड्डा डोळ्याआड केल्याचा आरोप स्थानिक डीबी स्क्वॉडवर करण्यात आला आहे.
अड्ड्याला संरक्षण? – गंभीर आरोप
अंदाजे आठवड्याभरापूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला डीबी स्क्वॉडच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही वेळातच त्याला मुक्त करण्यात आल्याने नाराज व्यापाऱ्यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती.
पोलीस आयुक्तांचा खडसावणीचा इशारा-
कारवाईनंतर आयुक्त सिंगल यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले. बेकायदेशीर धंद्यांना अभय देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, आणि आवश्यक असल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.