नागपूर – एका २४ वर्षीय युवकाने रेल्वे स्टेशनजवळ विष घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील गावातील हा युवक एका तरुणीवर प्रेम करत होता. मात्र त्यांच्या वादानंतर संबंधित तरुणीने त्याच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युवक रेल्वे पोलिस स्टेशनजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला. सुरुवातीला त्याला उष्माघात झाला असावा असे वाटले, मात्र त्याच्या तोंडातून फेस येणे आणि विशिष्ट रासायनिक वास येत असल्याने विषप्रयोगाचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याला तत्काळ मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र सायंकाळी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांना त्याच्याकडील पिशवीतून ओळख पटवण्यात यश आले. आत्महत्येपूर्वी या युवकाने त्याच्या मित्रांशी झालेल्या संभाषणात आपल्या प्रेयसीच्या फसवणुकीबद्दल सांगितले होते. पोलिसांचा अंदाज आहे की, बदनामी आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे.