नागपूर-भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात युद्धसज्जतेचा माहोल तयार होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल म्हणजेच युद्धपूर्व सराव करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार नागपूर जिल्ह्यातही लवकरच युद्धसराव होण्याची शक्यता असून, जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या अधिकृत आदेशाची वाट पाहत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले की, “केंद्रीय आदेश प्राप्त झाले आहेत, परंतु राज्य शासनाकडून अंमलबजावणीसाठी अधिकृत आदेश मिळाल्यावर आम्ही कारवाई सुरू करू.” नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात विविध सरकारी आणि निमशासकीय विभागांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी हे या यंत्रणेचे प्रमुख असून आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रणा तात्काळ कार्यरत होते.
नागपूरचा सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा भूभाग-
नागपूर हे देशाच्या भौगोलिक मध्यभागी स्थित असून चारही दिशांनी उत्तम दळणवळण व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे नागपूरला सामरिक दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. संवेदनशील शहर म्हणून नागपूरची नोंद घेण्यात आली आहे.
१९७७ नंतरचा मोठा निर्णय-
भारत सरकारने १९७७ नंतर प्रथमच एवढ्या व्यापक स्वरूपात युद्धसरावाचे आदेश दिले आहेत. अग्निशमन, नागरी संरक्षण, गृह रक्षक दल तसेच एनसीसी, एनएसएस यांना यात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय नौदल आणि हवाई दलानेही विविध ठिकाणी युद्धसराव सुरू केला आहे.
नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची-
मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांची सज्जता आणि यंत्रणांची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. युद्ध नकोच, पण जर ती वेळ आलीच, तर नागपूर पूर्ण सज्ज असेल, अशी तयारी जिल्हा प्रशासनाने दर्शवली आहे.