नागपूर – नागपूर शहर गुन्हे शाखेच्या वाहन चोरी विरोधी पथकाने वाडी पोलीस ठाणे क्षेत्रात मोठी कारवाई करत हद्दपार आदेश झुगारून शहरात आलेल्या एका आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडून अवैधरित्या बाळगलेले हत्यार (चाकू) जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेंद्र उर्फ नरु रामखिलावन पांडे (वय ३२ वर्षे, रा. रामाजी आंबेडकर नगर, वाडी, नागपूर) याच्याकडे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. झडतीदरम्यान त्याच्याकडे अवैध चाकू सापडला. यावरून त्याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ००/२०२५, कलम १४२, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच ४+२५ आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपासादरम्यान, आरोपीवर आदेश क्रमांक ०१/२०२४ अन्वये दोन वर्षांसाठी नागपूर शहरातून हद्दपार करण्याचे आदेश असतानाही तो विनापरवानगी शहरात फिरताना आढळल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला वाडी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल इंगोले यांच्या नेतृत्वाखाली वाहन चोरी विरोधी पथकाने केली. गुन्हे शाखेच्या या तडाखेबंद कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.