नागपूर : गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांकडून २२ एप्रिल ते २४ एप्रिल २०२५ या कालावधीत विशेष ४८ तासांचे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपयुक्त परमसिंह, डीबी ब्रांचचे अधिकारी आणि अमलदार यांनी हे विशेष अभियान यशस्वीपणे पार पाडले.
या विशेष मोहिमेचा उद्देश शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवणे, त्यांच्या हालचाली तपासणे, आणि संभाव्य गुन्ह्यांना आळा घालणे हा होता.
या अभियानाअंतर्गत नागपूर शहरातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३०५ संशयित आरोपींची तपासणी करण्यात आली. तपासण्यात आलेल्या आरोपींपैकी काहींच्या नावावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. तपासणीतील आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
तडीपार गुन्हेगार : १०३
मकोका अंतर्गत आरोपी : १८
हिस्ट्रीशीटर गुन्हेगार : १८
शारीरिकदृष्ट्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी : २५
दारुबंदी कायद्यान्वये आरोपी : ३
एमपीडीए अंतर्गत आरोपी : ५
फायर आर्म बाळगणारे : १
बालगुन्हेगार / संशयित अल्पवयीन : १
या तपासणी दरम्यान, काही आरोपी हे पळून गेले होते, तर काही घरात नसल्याचे आढळले. अशा आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पुढील पावले उचलली आहेत. तपासणीत काही आरोपींविरुद्ध नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींविरुद्ध चौकशी सुरु आहे.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी घरपोच जाऊन आरोपींची तपासणी केली. काही प्रकरणांमध्ये आरोपींनी बनावट नावांचा वापर केल्याचेही आढळून आले. काही आरोपी आजारी असून उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, काही आरोपींनी पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, पेट्रोलिंग, वीज वितरण यासारख्या सरकारी सेवांमध्ये काम करत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी यावेळी काही आरोपींच्या घरी पाहणी केली असता, ते बाहेरून साधे सामान्य नागरिक वाटले तरी त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई होणार आहे. काही आरोपी हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे आढळून आल्याने, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहीम राबवल्या जात राहतील. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.