पहलगाम: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात पर्यटकांवर केलेल्या निर्घृण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, चारही दहशतवाद्यांचे स्पष्ट फोटो समोर आले आहेत. लष्कराच्या गणवेशात सज्ज आणि AK-47 रायफल्ससह उभे असलेल्या या दहशतवाद्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सुरक्षा यंत्रणांनी याआधी या चार दहशतवाद्यांची स्केचेस जारी केली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांच्या प्रत्यक्ष फोटो समोर आल्याने चौकशीला वेग आला आहे. हा फोटो हल्ल्याआधीचा असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
हल्लेखोरांनी लष्करी पोशाख घालूनच गोळीबार केला. अचानक झालेल्या या बेछूट गोळीबारात २८ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला असून, यामध्ये दोन विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. या क्रूर हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोएबा’च्या ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या शाखेने स्वीकारली आहे.
हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, सुरक्षायंत्रणा या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी सतर्क झाली आहेत.