नागपूर: नागपूर शहर सध्या तीव्र उष्णतेच्या झळा सोसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात प्रचंड उकाडा जाणवतो आहे. मंगळवारी (22 एप्रिल) नागपूरचे तापमान 44.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीहून तब्बल 3 अंशांनी अधिक आहे. हवामान विभागाने 25 एप्रिलपर्यंत नागपूरमध्ये ‘हिट वेव्ह’ (उष्णतेची लाट) कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे आणि यलो अलर्ट जारी केला आहे.
एप्रिल महिन्यात आतापर्यंत पाच दिवसांमध्ये तीन वेळा तापमान 44 अंशांवर किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात 19 एप्रिल रोजी सर्वाधिक तापमान 44.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. 20 एप्रिलला तापमान 44 अंश आणि 22 एप्रिलला 44.2 अंश सेल्सिअस राहिले.
गेल्या पाच दिवसांमध्ये तिसऱ्यांदा तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे अवघड झाले असून, उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. सध्या वातावरणात कोणतीही आर्द्रता प्रणाली सक्रिय नसल्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 25 एप्रिलपर्यंत तापमान 44 ते 45 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. शक्यतो दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षण करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.