नागपूर – पाचपावली पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तूल दाखवून मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. कमल बार अँड रेस्टॉरंट, इंदोरा चौक येथे घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.
माहितीनुसार, ६ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास, संघरत्न मिलींद भोयर (वय ३१), रा. आंबेडकर मार्ग, पाचपावली, नागपूर हे कमल बारमध्ये गेले असता, त्याठिकाणी पूर्वीच्या वादातून प्रितपालसिंग सुरजितसिंग समलोक (वय ४८) व बारमालक गगनदिपसिंग हरविंदरसिंग तलवार (वय ३०), दोघेही रा. बाबा बुध्दाजी नगर, पाचपावली यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत बारच्या मागील खोलीत नेऊन जबर मारहाण केली. या मारहाणीत आरोपी समलोकने देशी बनावटीचे पिस्तुल दाखवून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम २९६, ११५, ३५१(३), ३(५) सह ३/२५ भा.ह.का. अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली देशी बनावटीची पिस्तुल मॅगझीनसह (किंमत अंदाजे २५,०००/-) जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई महेक स्वामी (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३), श्रीमती श्वेता खाडे (सहायक पोलीस आयुक्त, लकडगंज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि बाबुराव राऊत, पोउपनि राजेंद्र जाधव, पोहवा ज्ञानेश्वर भोगे, ईम्रान शेख, आनंद सिंग, पोअं. अमोल ठाकरे, गगन यादव व संतोष शेंदरे यांनी केली. पाचपावली पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.