नागपूर –उत्तर प्रदेशात मेरठ आणि मुरादाबाद येथे ईदनिमित्त रस्त्यावर नमाज अदा करण्यावरून पोलीस आणि मुस्लीम नागरिकांमध्ये चकमक उडाली. अनेकांनी या वेळी पोलिसांवर दगडफेक केली तर काही जणांनी पॅलेस्टिनी झेंडे दाखवले तसेच काहींनी हातावर काळी पट्टीही बांधली होती. रस्त्यावर नमाज अदा करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
माझ्या माहितीनुसार, कुराण इतक्या हळू आवाजात पठण करण्याचा सल्ला देतो की, तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही तो ऐकू येणार नाही. इस्लाममध्ये इतरांना त्रास देण्याची कोणतीही संकल्पना नाही, असे प्यारे खान यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणे हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक अडथळ्यांच्या कारणास्तव यावर आक्षेप नोंदवले जातात. यावर अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले की, धर्म हा संयम आणि शांतीचा मार्ग दाखवतो.
दरम्यान हा मुद्दा धार्मिक असला तरी सामाजिक आणि कायदेशीर दृष्टीकोनातून तो हाताळण्याची गरज असल्याचे मत प्यारे खान यांनी व्यक्त केले.
			



    
    




			
			