नवी दिल्ली:कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. लोकनायक रुग्णालयाने याची पुष्टी केली आहे. शनिवारी रात्री प्रयागराज ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर उभी होती असे सांगण्यात येत आहे. त्यावर स्वार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.
स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेसच्या धावण्यास विलंब झाल्यामुळे, तिचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर होते.
दरम्यान, प्रयागराज ट्रेनमसाठी अधिक प्रवासी येऊ लागले. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १६ च्या एस्केलेटरजवळ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली. यात अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
परिस्थिती नियंत्रणात – रेल्वेमंत्री
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट केले की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिस आणि आरपीएफ पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अचानक गर्दी हटवण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.