नागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घासल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मतदानाची टक्केवारी घसरल्याचे वृत्त समजताच भाजप आणि काँग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढली. नागपूर टुडेने यासंदर्भात वरिष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांच्याशी चर्चा केली.
मतदारांचे यादीत नाव नसणे हे जिल्हा प्रशासनाचे अपयश –
नागपुरात बहुतांश नागरिकांचे मतदार यादीत नाव नसणे हे जिल्हा प्रशासनाचे अपयश असल्याचे मैत्र म्हणाले. तसेच देशाचा जबाबदार नागरिक होण्याच्या नात्याने आपणही याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. मात्र निवडणूक समीकरणावर याचा तितका परिणाम पडणार नसल्याचे मैत्र म्हणाले.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक शुक्रवारी शांततेत पार पडली.पूर्व विदर्भातील पाचही मतदारसंघांत काल मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मात्र नागपूर मतदारसंघात मतदारांची टक्केवारी घासल्याचे चित्र आहे.राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कमी प्रमाणात मतदान झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कारण या मतदारसंघातून भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस नेते विकास ठाकरे यांच्या चुरशीची लढत होती. नागपूर मतदारसंघात केवळ ५१.५४ टक्केच मतदान पार पडले.
भाजप उमेदवार नितीन गडकरी निवडून येण्याची शक्यता-
लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घासल्याने त्याचा परिणाम थेट उमेदवारांच्या मतांवर पडणार आहे. कमी मतदान झाल्यामुळे भाजप उमेदवार नितीन गडकरी निवडून येण्याची शक्यता प्रदीप मैत्र यांनी व्यक्त केली.