नागपूर: शहरात शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात अनेक वस्त्या पाण्याखाली आल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. इतकेच नाही तर रस्ते तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही खोळंबली आहे.
मध्यरात्री झालेल्या तुफान पावसाने नागपूर शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक नद्या, नाल्यांसह शहरातील अनेक भागांत पाण्याने विळखा घातला असून काही भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
नागपूर शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
नागपूरच्या सीताबर्डी परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सीताबर्डी परिसरातील झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, तसेच मोर भवन चे परिसर पूर्णपणे पाण्याखाली आल्याने अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले आहे.त्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.यात दुचाकी किंवा चार चाकी वाहनच नाही, तर मोठमोठ्या बसेसही पाण्याखाली आल्या आहेत.
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतात पेरलेली पिके पाण्यात वाहून गेली.त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे.
नागपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट-
राज्यात येत्या ४८ तासात राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. राज्यातील नागपूर आणि रायगड या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.