नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दैनिक सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून टीका करण्यात आली. यावरून भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट, ‘सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग विझवावीच लागेल, असे म्हणत टीका केली आहे. उद्धव ठाकरे बावचळले असून आता खपवून घेणार नाही,सामनाविरोधात तक्रार करणार असा इशारा बावनकुळे यांनी दिला. नागपुरातील कोराडी येथे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सामना वृत्तपत्राविरोधात आमचे मुंबईचे नेते आणि कार्यकर्ते याविरोधात लढा देणार आहेत. यातून आंदोलनाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे ती आग विझवावीच लागेल. वृत्तपत्रांना जे स्वातंत्र्य दिले गेले आहे ते नियमाच्या बाहेर जाऊन लिहीत असतील तर ते खपवून घेणार नाही.आम्ही या विरोधात रस्त्यावरची आणि कोर्टाची दोन्ही लढाई लढणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्तेबाबत मोठा दावा केला आहे.राज्यात लवकरच मुख्यमंत्री बदलणार असून अजित पवार त्या जागी विराजमान होणार असे ते म्हणाले होते. यावरही बावनकुळे यांनी भाष्य केले.
२०२४ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असणार आहे. आगामी निवडणुकाही शिंदे यांच्या नेतृत्वात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस लढणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.