नागपूर : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. नेत्यांचे कार्यकर्त्यांवर असलेले प्रेम हीच त्यांची संपत्ती आहे. पण, हे प्रेम सहजासहजी मिळत नाही.कार्यकर्ता टिकवण्यासाठी प्रत्येक नेत्यांना ‘चॉकलेट’ वाटण्याशिवाय पर्याय नसतो, असे गडकरी म्हणाले.
जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शरद पवार यांनाही टोला लगावला. शरद पवारांकडे पाहून प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटते की त्यांनी मलाच सांगितले की कामाला लागा, मात्र तिकीट भलत्यालाच मिळते, असे गडकरी म्हणाले.
कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, आपल्याला जेव्हा जबाबदारी मिळते ती आपण प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. अध्यक्ष हा माजी अध्यक्ष होतो, खासदार हा माजी खासदार होतो, पण कार्यकर्ता हा कधीच माजी कार्यकर्ता होत नाही, तर कार्यकर्ता हा कायम कार्यकर्ता असतो,असेही गडकरी म्हणाले.