नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली असून दोन महिने होऊनही आरोपींना अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर भाष्य केले.
मणिपूरची जी घटना समोर आली ती कोणत्याही सभ्य समाजासाठी लज्जास्पद घटना आहे. हे पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे बाजूला ठेवा. मात्र, या घटनेने संपूर्ण देशाला मान खाली घालायला लावले आहे. १४० कोटी देशवासीयांना खाली पहावं लागत असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे रोजी घडली आहे. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्य पोलीस दल आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे.