मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत अचानक औरंग्याच्या अवलादी कुठून पैदा झाल्या,असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. आता एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी या वक्तव्यामागची भूमिका नेमकी काय होती हे स्पष्ट केले आहे.
माझ्या विधानावरून फडणवीस मुस्लिमांना लक्ष्य करत असल्याची टीका करण्यात आली. मात्र यात काहीच तथ्य नाही.
मी म्हणालो होतो की अचानक महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं स्टेटस लावायला सुरुवात झाली आहे. त्यांचे फोटो लावायला सुरुवात झाली. मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. औरंगजेब तर आपला हिरो नाही. भारतीय मुस्लिमांचाही हिरो नाहीत. त्याचे वंशजही इथे नाहीत. ते टर्की मंगोल होते. देशभरात या वंशाची किती कुटुंबं निघतील? त्यामुळे त्यांची काही मुलं वगैरेही नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर अचानक इतके लोक त्याचे स्टेटस ठेवायला कसे लागले? असा संतप्त सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
त्यामुळेच मी म्हणालो माझ्या मनात हा संशय आहे की औरंगजेबाच्या इतक्या अवलादी कशा जन्माला आल्या? त्याच्या अवलादी तर नाही आहेत. मग याचा अर्थ असा आहे की हेतुपुरस्सर काही लोक सामाजिक सलोखा बिघडवू इच्छित आहेत. तेच लोक असे फोटो लावत आहेत. कारण भारतीय मुस्लीम आणि राष्ट्रवादी मुस्लिमांचा औरंगजेब हिरो होऊ शकत नाही. यात मी काय चुकीचं बोललो? असा उलट सवाल उपस्थित करत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
औरंगजेबाने लाखो हिंदूंना त्याने मारले आहे. देशभरातली मंदिरे तोडली. छत्रपती संभाजी महाराजांचा त्यानी ११ दिवस छळ केला.अशा औरंगजेबाचे पोस्टर जर कुणी लावत असेल, तर कसे सहन केले जाईल? हे ठरवून केले जात आहे. सरकार बदललं आणि हे अचानक घडायला लागले, असा आरोप फडणवीस यांनी केला.