नागपूर : पुण्याहून मंगळवारी नागपूरकडे उड्डाण केलेले इंडिगोचे विमान अंधूक प्रकाशामुळे नागपूरऐवजी मुंबईकडे वळवण्यात आले.हे विमान पुणे येथून सकाळी ११.१५ वाजता उडाले आणि १२.३० वाजता नागपूरला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र अचानक विमानाला मुंबईकडे वळविण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली.
मुंबईला पोहोचल्यानंतर इंडिगोने प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची सोय करून दिल्याने ते विमान सायंकाळी साडेपाच वाजता नागपूर विमानतळावर उतरले. पावसामुळे हवामानात बदल झाल्याने ढगाळ वातावरण तयार झाले होते.
याचा परिणाम विमानसेवेवर झाला. पुणे विमानतळावरुन नागपूरसाठी उडालेले विमान अंधूक प्रकाशामुळे विमान उड्डाणाचा मार्ग वळविण्यात आल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले होते. तब्बल साडेपाच तास उशिराने इंडिगोचे ते विमान नागपुरात साडेपाच वाजता उतरले आणि सांयकाळी ६.३० वाजता मुंबईला परत रवाना झाले. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.