Published On : Thu, Aug 25th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार उत्सव साजरा करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

Advertisement

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड संलग्न करण्यासाठी उपक्रम

नागपूर : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनी महसूल व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. ‘एक गाव, एक गणपती’ या अभिनव संकल्पनेनुसार सर्वांनी उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, पोलीस उप अधीक्षक (गृह) संजय पुरंदरे यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.

डॉ. इटनकर म्हणाले, गणेशोत्सव काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल व पोलीस विभागाने सार्वजनिक गणेश मंडळ तसेच गणेश विर्सजनाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विर्सजनाच्या ठिकाणी स्वच्छता, निर्माल्य विर्सजन, लाईटची व्यवस्था, बॅरिकेट्स, स्वयंसेवक आदी बाबींचे नियोजन करण्यात यावे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या गणपती मुर्तींना नैसर्गिक पाण्याच्या नदी-तलावसाख्या स्त्रोतांमध्ये विर्सजित करण्यात येवू नये. घरगुती गणपती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणपतींना कृत्रिम तलाव किंवा घरगुती टँकमध्ये विर्सजित करण्यात यावे.

तालुकास्तरावर नगरपरिषद व महसूल विभागाने पडीक जमीन तसेच बंद झालेल्या खाणी याठिकाणांची माहिती गोळा करुन कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी नियोजन करावे. विर्सजनाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यात याव्यात. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक नियमांनुसार कारवाया कराव्या. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी व गर्दीच्या व्यवस्थापनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. शांततामय वातावरणात उत्सव साजरा होण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाच्या उपाययोजनांना सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. इटनकर यांनी केले.

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड संलग्न करावे- जिल्हाधिकारी

प्रत्येक नागरिकाची ओळख स्पष्ट होण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राला आधार कार्ड संलग्न करण्याचा उपक्रम आखला आहे. त्यानुसार नागरिकांनी फॉर्म नंबर-6 ब भरुन निवडणूक विभागाव्दारे नियुक्त मतदान केंद्र अधिकारी यांना सादर करावे. यासाठी निवडणूक विभागाकडून ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडता येईल. या ॲपचा उपयोग करणे अगदी सोपे असून नागरिकांनी त्याव्दारे आधारकार्ड जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेऊन गणपती दर्शनाला येणाऱ्या भक्तांना याचा लाभ करुन द्यावा. या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गणेश मंडळाला निवडणूक विभागाकडून बक्षीसे जाहीर करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement