– अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर : एकही वर्ग न शिकताना समाजाच्या परिवर्तानासाठी आदर्श ठरावे अशी साहित्याची निर्मिती हे अण्णा भाऊ साठे यांच्या व्यक्तिमत्वाची महती सांगण्यास पुरेसे आहे. ‘जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भिमराव’ यापासून ते ‘ये आझादी झुठी हैं, देश की जनता भुखी हैं’ इथपर्यंतचा हा साहित्यिक प्रवास क्रांतिकारी आणि परिवर्तनाची ठिणगी टाकणारा आहे. आजही महाराष्ट्राच्या जडणघडणीत अण्णा भाऊंच्या साहित्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.
लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमी चौकातील अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकस्थळी ते बोलत होते. यावेळी ॲड. मेश्राम यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सचिव सतीश शिरसवान, शंकरराव वानखेडे, किशोरजी बेहाडे, महेंद्र प्रधान, योगेश पाचपोर, सागर जाधव, इंद्रजीत वासनिक,नितीन वाघमारे व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वडिलांसोबत सांगलीच्या वाटेगाव पासून मुंबईच्या धारावीपर्यंतचा सुमारे ३५० किमी चा प्रवास पायी करीत पुढे कष्टक-यांचा आवाज अण्णा भाऊ ठरले. मिळेल ते काम करून पोटाची खडगी भरताना बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले जे कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरणारे आहेत. एकही वर्ग न शिकलेली व्यक्ती अनेक साहित्यांची निर्मिती करतो आणि ती साहित्य सुमारे २७ भाषांमध्ये अनुवादित होतात ही ख-या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण करून मिळविलेली ताकद आहे. अण्णा भाऊंनी बाबासाहेबांच्या आदर्शातून समाजाचे कार्य नेटाने केले, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.