धुळ्यात 1791 कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण
नागपूर: धुळे-नंदूरबार हा मागासलेला भाग असताना शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून महामार्गाची कामे करताना जलसंधारण होईल अशा रीतीने कामे करून घ्या. कारण पाणी हाच कळीचा मुद्दा आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी बुलढाणा पॅटर्न राबवून पाणीटंचाईवर मात करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
धुळे येथे 1791 कोटींच्या महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. या धुळे, नंदूरबार, जळगाव या भागात सुमारे 4 हजारपेक्षा अधिक कोटी रुपयांची कामे करण्यात येत असून 15 महामार्ग प्रकल्पाचे आज लोकार्पण व भूमिपूजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला खा. हिना गावीत, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल, आ. गिरीश महाजन, आ. अमरीशभाई पटेल, आ. काशीराम पावरा, आ. विजयकुमार गावीत, आ. कुणाल पाटील, आ. मंगेश चव्हाण, महापौर प्रदीप कर्पे, आ. राजेश पाडवी व अन्य उपस्थित होते.
या भागातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या रस्त्यांच्या सुमारे 12 ते 15 हजार कोटींच्या मागण्या आपण मंजूर करीत असल्याचे बोलताना ना. गडकरी यांनी सांगितले की, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या या भागात पाणी, वीज, वाहतूक आणि संदेशवहन यासोबत रस्ते असतील तर येथे उद्योग व्यापार वाढेल. नवीन उद्योग आले की रोजगार येईल आणि रोजगार निर्माण झाला की गरिबी, उपासमार दूर होईल. याच आधारावर विकास होणे गरजेचे आहे. शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी मिळाली पाहिजे. बुलढाणा पॅटर्नमध्ये आपण रस्त्याची कामे करताना नदी नाल्यांचे खोलीकरण करून जलसंधारणाची कामे केली. आज या भागातील पाणीटंचाई संपली. धुळे-नंदूरबार या भागातही हा पॅटर्न राबविला जावा. पाणी आले तर सुबत्ता येईल, विकास येईल व गरीबी दूर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असेही ते म्हणाले.
650 रस्त्यांशेजारी सुविधा
महामार्गांवर नागरिकांना रस्त्यांशेजारी आवश्यक सुविधा उपलब्ध नाही. आता देशातील 650 रस्त्यांशेजारी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणार असून आईने लहान बाळाला दूध पाजण्यासाठी लागणारी व्यवस्थाही करून देण्यात येईल. यासोबतच शासकीय जागा असतील तर या भागात लॉजिस्टिक पार्कही आपण एनएचएआयच्या निधीतून बांधून देण्यास तयार आहोत, असे ना. गडकरी यांनी सांगितले.
आश्वासने पूर्ण करणार्यांवरच जनतेचा विश्वास
लोकांना खोटे आश्वासन देऊन आता कुणी मूर्ख बनवू शकत नाही. खोटे स्वप्न दाखवू नका. जेव्हा त्यांची स्वप्ने उद्ध्वस्त होतात, तेव्हा जनताही त्यांना उद्ध्वस्त करते. जे दाखविलेली स्वप्ने प्रत्यक्षात पूर्ण करतात त्यांच्यावरच जनता विश्वास ठेवते. काम होत नसेल तर स्पष्ट सांगितले पाहिजे व जे कबूल केले ते पूर्ण केले पाहिजे, असे ना. गडकरी यावेळी भाषणातून म्हणाले.