सिम्बायोसिसच्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
नागपूर: पूर्व नागपुरातील सिम्बायोसिसच्या कौशल्य विकास केंद्रामुळे या भागातील मुला-मुलींना प्रशिक्षण उपलब्ध होऊन ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकतील, त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते-महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
सिम्बायोसिसच्या कौशल्यविकास केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, डॉ. मुजुमदार, डॉ. सुमती गुप्ते, आ. कृष्णा खोपडे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- सिम्बायोसिस विद्यापीठ नागपुरात येण्यापूर्वी प्रत्येक जण सांगत होते की माझा मुलगा पुण्याला शिकतो. या दरम्यान मी पुण्यात गेलो असता डॉ. मुजुमदार यांची भेट घेऊन त्यांना नागपुरात येण्यास विनंती केली. पण नागपुरात जागा घेऊ शकणार नाही अशी असमर्थतता डॉ. मुजुमदारांनी व्यक्त केली. महापालिकेच्या माध्यमातून त्यांना आम्ही जागा उपलब्ध करून दिली. आज ज्या जागेवर हे विद्यापीठाचे प्रशस्त आणि सुंदर कॉम्प्लेक्स उभे आहे, त्या जागेवर आधी डंपिंग यार्ड होते. या जागेचा लोकांसाठी व चांगला उपयोग व्हावा या उद्देशाने ही जागा या संस्थेला देण्यात आली असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
सिम्बायोसिसला ही जागा देताना 25 टक्के प्रवेश नागपूरकरांसाठी राखीव राहतील आणि फी मध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांना 15 टक्के सवलत दिली जावी या दोन अटी आम्ही घातल्या होत्या, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे चांगले विद्यापीठ येथे उभे झाले. सर्वात चांगल्या डिझाईनचे हे कॅम्पस तयार झाले आहे. आज कौशल्य विकासाचे प्रशिक्षण येथे सुरु झाले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण ही आजची गरज आहे. मागास भागातील मुला-मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे ते आपल्या पायावर उभे राहू शकतील. याच भागात आंतरराष्ट्रीय दर्जा स्पोर्ट्स विद्यापीठही सुरु होणार आहे. यामुळे या भागाचे महत्त्व अधिक वाढणार असल्याचेही ते म्हणाले.
शहराच्या सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनविण्याचे व त्यावर ट्रक आणि बस चालविण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सांडपाणी विकून 325 कोटी रुपये उत्पन्न मिळविणारी नागपूर महापालिका ही देशातील पहिला महापालिका आहे. हे दोन्ही प्रकल्प नावीन्यपूर्ण आहेत, असेही ते म्हणाले.