महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवी समारंभ
कृष्णराव भागडीकर सभागृहासाठी 25 लाखांची घोषणा
नागपूर: समाजातील दलित, पीडित आणि शोषित महिलांना ज्ञान मिळवून देणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. अशा शोषित महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ज्ञानाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते-महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयात बांधण्यात येणार्या कृष्णराव भागडीकर सभागृहासाठी ना. गडकरी यांनी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
महिला महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, विजय घाटे, चंदूजी पेंडके, दिलीप खोडे, प्राचार्य वंदना भागडीकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना ना. गडकरी म्हणाले- ही संस्था खूप मोठी व्हावी असे मला वाटते. सर्वप्रकारचे सोंग करता येते पण पैशाचे सोंग घेता येत नाही. विजूभाऊ मंडलेकर, कृष्णराव भागडीकर यांनी भरपूर मेहनत घेतली व विद्यार्थी घडविले. विजूभाऊ मंडलेकर यांच्याशी माझे घरोब्याचे संबंध होते. ते माझ्या भावासारखे होते. माझ्या परिवाराशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. आता त्यांच्या नावाने कॉस्मेटिक कॉलेजही सुरु झाले, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
सुवर्ण महोत्सवामुळे बांधण्यात येणार्या कृष्णराव भागडीकर सभागृहासाठी आपण 25 लाख रुपयांची मदत करणार आहे. यापैकी 15 लाख रुपयांचा पहिला हप्ता येत्या 8-10 दिवसातच मिळेल. अत्यंत चांगले व सर्व सुविधायुक्त सभागृह येथे आपण बांधू. नव्याने बांधकामाचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
महिला महाविद्यालय अभिमत विद्यापीठ कसे होईल यासाठी प्रयत्न करू असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- महाविद्यालयाच्या जुन्या विद्यार्थ्यांशी संपर्क करा. त्यांच्या मदतीनेही निधी उपलब्ध होऊ शकतो. समाजकार्यासाठी शैक्षणिक मूल्यांशी कटिबध्दता असणार्या संस्था नागपुरात फार कमी आहेत. या महाविद्यालयाने गडचिरोलीत आदिवासी विद्यार्थिनी, महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्याचे चांगले काम केले आहे. मूल्याधिष्ठित संस्कार कायम ठेवून योग्य शिक्षण मिळाले तर आजची पिढीही ते शिक्षण स्वीकारेल असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमात सौ. फडणवीस, सौ. जोशी, सौ. पांढरीपांडे, सौ. फुलारी यांचा सत्कार करण्यात आला.