नागपूर : आपण निर्मित केलेली उत्पादने ही सर्वात गुणवत्तापूर्ण तसेच त्यांचे सादरीकरण चांगले असावे, त्या वस्तूंचे उत्पादन हे संकेत स्थळावरून तसेच ई- मार्केटिंगच्या आधुनिक माध्यमातून केल्यास महिलांना त्यांचा चांगला लाभ होईल आणि त्यांना उद्योगांमध्ये यश येईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केलं. स्थानिक सिव्हिल लाईन्स मधील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रात 25 ते 28 मार्च दरम्यान आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एम एस एम ई विकास संस्था नागपूर चे संचालक पीएम पार्लेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्योग व्यवसायात प्रामाणिकपणा विश्वसनीयता तसेच सदिच्छा ही महत्त्वाची असून त्यामुळेच एखाद्या वस्तूचा ब्रॅण्ड प्रस्थापित होतो उद्योजकांनी हे लक्षात ठेवणे असून विशेषतः महिला उद्योगांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यास त्यांना चांगले यश मिळेल. पूर्ण जग ही एक बाजारपेठ झाली आहे, उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितलं.
महिला उद्योजकांना एम एस एम ई तसेच गायत्री उद्योग सहकारी संघाचे सुद्धा सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.28 मार्च पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र येथे हे उद्योजिका प्रदर्शन सुरू असून या ठिकाणी विविध प्रकारची दालने महिला उद्योजकांनी स्थापन केलेली आहेत.