पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प पुढील २५ वर्षांच्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे मत भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. ते केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही ९.२% आर्थिक विकासाचा दर व्यक्त केलेला नव्हता. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तो व्यक्त केला. ही अतिशय आनंदाची बाब आहे. देशाच्या बळकटीकरणासाठी आजचा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार हे निश्चित. तसेच मा. निर्मला सीतारामन यांनी देशाच्या विकासात महत्वाच्या ठरणाऱ्या प्रत्येकच बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
देशात आत्मनिर्भर आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून 60 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ऊर्जा, विपणन क्षेत्राला भरारी मिळणार असून, 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग आणि 400 वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून देश गतिमान होण्यास मदत मिळेल असा विश्वास यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
देशात 5G सेवेचा प्रारंभ, गावांमध्ये ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर अर्थमंत्र्यांनी दिलेला भर विशेष आनंदाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असून, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर म्हणजे कृषीची क्रांती असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. तसेच या बहुआयामी अर्थसंकल्पासाठी मा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले.