मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण १५६ सदस्यांकरीता ५२ प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व ५२ प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.
नागरिकांची प्रभाग रचना बघण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून सर्व प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे हे नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याशिवाय मनपाचे सिव्हिल लाईन्स येथील मुख्यालय व सर्व झोन कार्यालयांमध्ये प्रभाग रचनेचे नकाशे प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रभाग रचनेवर काही हरकती व सूचना असल्यास त्या १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान दुपारी ३ वाजेपर्यंत मनपा निवडणूक कार्यालय सिव्हिल लाईन्स किंवा संबंधित क्षेत्रीय (झोन) कार्यालय येथे जमा करावे. हरकती व सूचना दाखल करण्याऱ्या नागरिकांना सुनावणी करीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाच्या २८ जानेवारी २०२२च्या पत्रान्वये आरक्षणाची सोडत नंतर काढण्यात येणार आहे.