नागपूर : राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष राज्य मुष्टीयुध्द (बॉक्सिंग) अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या क्रीडापटूंचा महापौर व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी (ता.५) महापौर कक्षात सत्कार केला.
सर्व विजेत्या खेळाडूंना मनपाचा मानाचा दुपट्टा, तुळशी रोप व ट्रॅक सूट देउन महापौरांनी सन्मानित केले. यावेळी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक नागेश सहारे, बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव अरुण बुटे, टिम मॅनेजर कार्तिक कावरे, सहसचिव व गणेशपेठ ठाण्याचे निरीक्षक भारत क्षीरसागर, डॉ.विजय तिवारी उपस्थित होते.
बुलढाणा येथे पुरुषांची बॉक्सिंग स्पर्धा आणि भद्रावती येथे महिलांची बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुरुषांच्या स्पर्धेमध्ये ६७ किलो वजनगटात रीतिक मेश्राम यांनी रौप्यपदक, ४९ किलो वजनगटात लूमेन साहू यांनी रौप्य पदक, महिलांच्या स्पर्धेमध्ये ६० किलो वजन गटात श्रृती झाडे यांनी कांस्य पदक, ४८ किलो वजनगटात शिवानी राय यांनी कांस्य पदक पटकाविले तर ८० किलो वजनगटात इशिका करवाडे यांची २० ऑक्टोबरपासून हिसार, हरियाणा येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल महापौरांसह मान्यवरांनी अभिनंदन करीत त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी उपायुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके व स्वच्छता विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.