नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्णांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आशीनगर झोनच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी (२ ऑगस्ट) रोजी दयानंदनगर, आंबेडकर मार्ग येथील रहिवासी चंद्रशेखर तांबे ( वय ५८ वर्ष) यांना कोव्हॅक्सीन लस घरी जाऊन त्यांना पहिला डोस देण्यात आला. श्री. तांबे मागच्या १३ वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत.
अति.आयुक्त श्री. राम जोशी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. गोवर्धन नवखरे यांचे मार्गदर्शनात आसीनगर झोनचे झोनल वैद्यकिय अधिकारी डॉ.दिपांकर भिवगडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल च्या डॉ. अस्मिता गोले, गिता जांभुळकर (ANM) व रंजीता परतेकी अटेन्डंट यावेळी उपस्थित होते.
अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे मनपा तर्फे कळविण्यात आले आहे.
राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे. अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती मनपाला प्राप्त झाल्यानंतर त्यांना लस देण्यात येईल.
			




    
    




			
			