“आज दि. २९ जूनला दिल्ली येथे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी वेदच्या प्रतिनिधींसोबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री. धर्मेंद्रजी प्रधान यांची पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याच्या अनुषंगाने ‘टेक्नो इकॉनॉमिक फिजीबिलीटी स्टडी’ची कार्यवाही लवकर सुरु करण्यासंदर्भात भेट घेतली.
विदर्भातील उद्योगधंद्यांची गरज व बेरोजगारीचे वाढते प्रमाण पाहता पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणावा, यासाठी मी मागील ६ वर्षांपासून मागणी करीत असून याचा सतत पाठपुरावा करीत आहे, हे सर्वश्रुत आहे. विदर्भात तीन लाख कोटींचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आल्यास हिंगणा, बुटीबोरी व मिहान या औद्योगिक भागासह मध्य भारतातील उद्योगक्षेत्राला याचा फायदा होईल. या प्रकल्पाच्या विविध आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय प्रभावांबद्दल आवश्यक असलेला सर्व तपशील मी संग्रहित करून त्याचा सखोल अभ्यास केला.
तसेच प्रकल्पाची गरज, गुंतवणूक, आवर्ती खर्च, रोजगाराची संभाव्यता, भविष्यातील शक्यता आणि जोखीम देखील काळजीपूर्वक तपासल्या आणि त्यानंतर श्री. देवेन्द्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतांना २०१८ मध्ये पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणावा, यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केलेत. विधानसभेत व विधानसभेच्या बाहेरसुद्धा आवाज बुलंद केला. विदर्भातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा व विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा, हीच त्यामागची भूमिका होती. त्यानंतर नागपूर येथील विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांनी २० जुलै २०१८ ला मला मा. पंतप्रधान व मा. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे सतत पाठपुरावा करून पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणू, असे आश्वासन दिले होते.
आज २९ जून २०२१ ला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री. धर्मेंद्रजी प्रधान यांना या प्रकल्पासंदर्भात भेटून श्री. फडणवीस यांनी मला विधानसभेत दिलेल्या आश्वासनाच्या संदर्भात ३ वर्षांनी का होईना कार्यवाही सुरु केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. हा प्रकल्प खऱ्या अर्थाने विदर्भात लवकरात लवकर सुरु होईपर्यंत श्री. फडणवीस यांनी असाच पाठपुरावा पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री श्री. धर्मेंद्रजी प्रधान यांच्याकडे चालू ठेवावा, अशी विनंती मी विदर्भातील युवक व जनतेतर्फे करीत आहे. यात माननीय मुख्यमंत्री व सर्व पक्षीय नेत्यांनी देखील मदत करावी, जेणेकरून विदर्भाचा कायापालट होईल.
हा प्रकल्प विदर्भात आल्यास औद्योगिक व आर्थिक क्रांती घडेल जेणेकरून बेरोजगारीवर आळा बसून प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती करता येईल. पाच ट्रिलीयन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठायचा असेल तर देशातील सर्वच प्रदेशांसह विदर्भाचा देखील सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे”, असे वक्तव्य कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्याच्या अनुषंगाने ‘टेक्नो इकॉनॉमिक फिजीबिलीटी स्टडी’ची कार्यवाही सुरु करण्यासंदर्भात श्री. फडणवीस केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना भेटले. यावर डॉ. आशिष देशमुख यांनी आपली प्रतिकिया व्यक्त केली.
ट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणण्यासंदर्भात डॉ. आशिष देशमुख यांचे महत्वाचे मुद्दे:-
१. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्प विदर्भात सुरु करणे आवश्यक आहे कारण येथे स्वस्त जमीन, नैसर्गिक पाणी, जंगल, संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे, स्वस्त स्टील, सिमेंट, मनुष्यबळ, कमी किंमतीत तयार उत्पादनांचे वितरण, तयार उत्पादनांची विविध श्रेणी, प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणारा कमी वेळ व इतर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असून रत्नागिरीच्या तुलनेत या प्रकल्पाच्या खर्चात रु. ५०,००० कोटींची बचत होऊ शकते. विदर्भाच्या तुलनेत रत्नागिरी येथे तयार होणाऱ्या उत्पादनांच्या वितरणाचा खर्च खूप जास्त असणार आहे, दरवर्षी अंदाजे रु. २०,००० कोटी. हा आकडा विचारात घेतलेल्या अनेक घटकांवर आधारित आहे.
२. मुंबई व त्याच्या आसपासचे क्षेत्र मोठी लोकसंख्या व आवर्ती पायाभूत सुविधांचा सामना करीत आहे. पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, गृहनिर्माण इत्यादीसारख्या महत्वाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कमी पडत आहे.
३. वरील प्रकल्प देशाच्या ऊर्जा सुरक्षेवर मोठा गंभीर परिणाम करणारा आहे. ३ लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची संकल्पना २०१५ मध्ये भाजपा-शिवसेनेतर्फे संयुक्तरित्या केली गेली होती. परंतु विविध कारणांमुळे शिवसेना तयार नसल्यामुळे हा प्रकल्प अधांतरी अडकला आहे.
४. जेव्हा संकल्पित निर्यातीला चांगली मागणी होती तेव्हा हा प्रकल्प निर्यातीला प्राधान्य देणारा प्रकल्प म्हणून दर्शविला जात होता. परंतु गेल्या ६ वर्षात परिस्थिती पूर्णपणे बदलली. हा प्रकल्प फक्त घरगुती मागणी आणि वापरावर अवलंबून असेल कारण गुजरातमधील पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर आधारित मुंबईत २ आणि गुजरातमध्ये ४ रिफायनरी कार्यरत आहेत.
५. ६० दशलक्ष एमटीपीए इतक्या मोठ्या क्षमतेसह या आरआरपीसीला प्रचंड गुंतवणूकीद्वारे पायाभूत सुविधायुक्त वितरण प्रणाली तयार करावी लागेल. परंतु, प्रकल्प विदर्भात स्थलांतरित केल्यास मोठी बचत होऊ शकते, जेथे प्रकल्पाचा चांगला वापर आणि शेवटच्या वापरकर्त्याच्या खर्चात बचत होईल. अर्थातच, होणारा प्रचंड खर्चही वाचू शकेल.
६. आपल्या सर्वांना माहित आहे की, आता पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्पासाठी किनारपट्टीचे स्थान आवश्यक नाही. किनारपट्टीपासून टाकलेल्या क्रूड पाइपलाइनद्वारे बर्याच इनलँड रिफायनरी यशस्वीरित्या कार्य करीत आहेत. खरं तर दिल्ली जवळ तीन मोठ्या रिफायनरी कार्यरत आहेत. पानिपत, भटिंडा, मथुरा सर्वांचा विस्तार होत आहे. असा प्रकल्प महाराष्ट्रातील विदर्भात सुरु केल्या जाऊ शकतो.
७. विदर्भातही अन्य इनलँड रिफायनरीप्रमाणे क्रूडचा पुरवठा पाईपलाईनद्वारे मुंबई-नागपूर एक्सप्रेस मार्गाने केल्या जाऊ शकतो. या पाईपलाईनमुळे रोड-रेल लॉजिस्टिकच्या होणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊ शकते. विदर्भातील रिफायनरी सध्याच्या सरासरी ८५० किलोमीटर अंतरापेक्षा ५०० चौरस किलोमीटर क्षेत्राला पुरवठा करू शकेल. पाईपलाईनद्वारे क्रूड आणि तयार उत्पादनांच्या वितरणासाठी वाहतुकीची पद्धत या मागासलेल्या विदर्भ भागासाठी ‘गेम चेंजर’ असेल.
८. महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशाला लागून छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगाना राज्य आहे. विदर्भातील या रिफायनरीमधून कमी खर्चात मिळणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांमुळे आणि स्वयंपाकाच्या गॅसमुळे दहा कोटी लोकसंख्येचा फायदा होईल. ४ लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळणाऱ्या नोकऱ्यांमुळे चांगले सामाजिक परिणाम खूप मोठे असतील. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादासाठी हा कायमस्वरूपी तोडगा असेल.
९. याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात कोळसा, मॅंगनीज, लोह खनिज, बॉक्साइट, चुनखडी, डोलोमाईट, तांबे, क्वार्ट्ज खाण क्षेत्र जिथे मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम पदार्थांची गरज असते, त्यांनासुद्धा कमी दरात पेट्रोलियम उत्पादनांचा लाभ मिळेल. या सर्व बाबींचा विचार करता, विदर्भ हा प्रस्तावित पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी प्रकल्पासाठी योग्य आहे. रिफायनरीमुळे अनेक नवीन पेट्रोकेमिकल युनिट अस्तित्वात येतील.
१०. विदर्भातील मोठ्या कापूस पिकासाठी पॉलिस्टरसारख्या उत्पादनाची आवश्यकता आहे, ज्यामुळे विविध श्रेणीचे दर्जेदार कापड उत्पादन होईल. या रिफायनरीमुळे शेती समूहाला मोठा फायदा होईल. पंतप्रधानांचे ५ एफचे विजन ‘फार्म फाइबर फॅब्रिक फॅशन फॉरेक्स’ विदर्भात साकार होईल.
११. या प्रकल्पातून विदर्भ आणि आसपासच्या राज्यात पोहोचण्यासाठी ओएमसीद्वारे सध्या घेतल्या जाणार्या लॉजिस्टिक खर्चात मोठी बचत होईल. ६ कोटी टन क्षमतेचे लॉजिस्टिक महत्वाची भूमिका बजावते. रस्ते, रेल्वे व विमानसेवा अशा पायाभूत सुविधांसाठी रत्नागिरी येथे मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे. परंतु, या सर्व सुविधा विदर्भात तयार आहेत. येथे प्रकल्प सुरु करण्यासाठी लागणारी प्रचंड गुंतवणूक आणि वेळ वाचेल.