महानगरपालिकेच्या आरोग्य चमूला प्रशिक्षण
चंद्रपूर : हत्तीरोग निर्मूलनाकरीता सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी मनपाचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात मनपाचे वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवारी (ता. २५) घेण्यात आली. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतिक बोरकर यांनी हत्तीरोग निर्मुलनासंदर्भात राबविण्यात येत असलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची माहिती दिली. हत्तीरोग निर्मुलनासंदर्भात राबविण्यात आलेल्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यात रूग्ण संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे.
सदर मोहिमेत आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, नागरिकांना औषध खाण्यास प्रवृत्त करणार आहेत. हत्तीरोगाच्या प्रतिबंधाकरिता यावर्षी देखील हत्तीरोग विरोधी तीन प्रकारची औषधे नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये गरोदर माता, दोन वर्षाखालील बालके, अतिगंभीर रूग्ण वगळता सर्वांना घरोघरी जाऊन प्रत्यक्ष देखरेखीत औषध खाऊ घालणे तसेच जिल्ह्यातील कोणतीही व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिल्या.