Published On : Thu, Mar 11th, 2021

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देश : टास्क फोर्स कमिटीची बैठक

Advertisement

नागपूर : कोव्हिड संदर्भात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या पाच दिवसाचा ‘कोव्हिड ट्रिटमेंट प्रोटोकॉल’ तपासून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करा, असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या कोव्हिड संदर्भात टास्क फोर्स कमिटीची बैठक बुधवारी (ता. १०) मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये पार पडली.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. मिलींद भ्रुशुंडी, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. अशोक जाधव, डॉ.उदय नरलावार, डॉ. आर.व्ही. गोसावी, डॉ.पी.आर.देव, डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. रूपाली पटले, डॉ. व्ही.सी. शेलगावकर, डॉ.एम.हरदास, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ. टिकेश बिसेन आदी उपस्थित होते.

नागपूर शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. मात्र यासोबतच जे रुग्ण गृह विलगीकरणामध्ये व त्यांच्यापर्यंत आरोग्य सुविधा व इतर बाबी पोहोचत नाही. अशांचे ‘टेलीकाउंसिलींग’ करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘आयएमए’तर्फे ९६ डॉक्टर पॅनलमध्ये असून त्यांच्यामार्फत ते करण्यात यावे. ‘आयएमए’च्या ९६ डॉक्टरांमार्फत झोननिहाय रुग्णांचे वर्गीकरण करून ती जबाबदारी देण्यात यावी, असेही निर्देश बैठकीत आयुक्तांनी दिले.

अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांचा मृत्यूदर शून्य असल्याची बाब पुढे आली आहे. यासंदर्भात विस्तृत ‘डेथ ऑडीट’ करून त्याचा अहवाल मनपाकडे सादर करण्यात यावा. यासोबतच खासगी रुग्णांलयामध्ये भरती केलेल्या कोरोना बाधित रुग्णाला शेवटच्या क्षणी शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविण्यात येते, हा गंभीर प्रकार असून यासंदर्भात सुद्धा विस्तृत तपास व चौकशी करून त्याचाही अहवाल टास्क फोर्स समितीच्या सदस्यांमार्फत सादर केला जावा, असेही निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

बैठकीमध्ये आयएमए च्या पदाधिकाऱ्यांनी निःशुल्क ‘टेलीकाउंसिलींग’ करण्यास तयारी दर्शविली. यापूर्वी सुद्धा अशी सुविधा आयएमए तर्फे देण्यात आली होती. वाढते संक्रमण पाहता त्यांनी पुढेही ही सेवा द्यावी, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

रेड झोनमध्ये मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक ती सर्व व्यवस्था करणे, ‘टेलीकाउंसिलींग’ साठी ९६ डॉक्टरांची आयएमए द्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचावी यासाठी डॉक्टरांची संख्या वाढविण्यात यावी. कमीत कमी रुग्णांमागे एक डॉक्टर असावे, अशी सूचना यावेळी टास्क फोर्स समितीच्या सदस्यांनी केली.

गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांनी तसेच त्यांच्या शेजारच्या नागरिकांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भात मनपाच्या घंटा गाडीवर ध्वनिमुद्रित जनजागृती संदेश प्रसारीत करण्यात यावे अशीही सूचना सदस्यांनी यावेळी मांडली.