नागपूर शहराचा अभिमान ठरणार देशासाठी प्रेरणादायी : ४ फेब्रुवारीला रामेश्वरमसाठी होणार रवाना
‘मन में है विश्वास, पुरा है विश्वास,
हम होंगे कामयाब, एक दिन…’
हे शब्द साकार करणाऱ्या नागपुरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मनपाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी नागपूरकरांची छाती गर्वाने फुलविली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या वतीने जागतिक विक्रमाच्या दृष्टीने रामेश्वरम येथून लहान उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. या उपक्रमात देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांमध्ये नागपुरातील दोन विद्यार्थिनींची झालेली निवड अभिमानास्पद आहे. जिद्द आणि चिकाटीच्या भरवशावर या दोन्ही विद्यार्थिनींनी नागपूरचे नाव उंचावले आहे.
परिस्थिती आणि अडचणींवर मात करीत यशाच्याही पुढचा पल्ला गाठणाऱ्या मनपा शाळेच्या विद्यार्थिनी आता अंतरिक्षामध्ये झेप घेण्यास सज्ज झालेल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या चार भिंतीच्या आत विज्ञानाचे धडे घेत अंतरिक्षाचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाती विनोद मिश्रा व काजल रामनरेश शर्मा या दोन्ही विद्यार्थिनी ७ फेब्रुवारीला उपग्रहांच्या जागतिक रेकॉर्डमध्ये सहभागी होऊन स्वत:च्या ध्येयपूर्तीचा मार्ग भक्कम करीत इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहेत. उद्या गुरूवारी (ता.४) तामिळनाडू एक्सप्रेसने दोन्ही विद्यार्थिनी रामेश्वरमसाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या या प्रवासासाठी प्रजासत्ताक दिनी शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडून कौतुकाची थाप आणि आशीर्वादरूपी शुभेच्छाही त्यांना मिळाल्या आहेत. महापौरांसह मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री.जलज शर्मा, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी विद्यार्थिनींच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
कुठल्याही शहरातील महानगरपालिकेच्या शाळा या म्हणजे गरीब आणि त्यातही गरजू परिवारातील मुलांसाठीच आहेत असा सर्वसामान्य व सर्वदूर असलेला समज… मोठ्या आणि चमचमीत खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या रांगेत उभे झाल्यास सहजतेने ओळखू येणारे हे विद्यार्थी.. पण स्पर्धेत कुठेच कमी मात्र नक्कीच नाही. फक्त आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठाची गरज आहे. त्यांच्याही डोळ्यात अनेक स्वप्न तरळतात, त्यांच्याही मानातील कुतुहलाचे कोडे सुटू पाहतात, ते कोडे सुटण्यासाठी विज्ञानाच्या पैलूंची जिज्ञासा त्यांच्याही चेह-यावर स्पष्ट झळकते. मात्र ते स्वप्न, ते कुतुहल, ती जिज्ञासा हेरण्याची इच्छाशक्तीही आवश्यक आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांमधील क्षमता सिद्ध करताना स्वत:ही सिद्ध होणे हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान लिलया पेलत विद्यार्थ्यांच्या क्षमता शहरापुढे, राज्यापुढे आणि आता देशापुढे मांडण्याचे काम मनपाच्या शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये तरळणा-या स्वप्नांचा मार्ग हा शाळेच्या भिंतीवरील फळा जेवढा स्पष्टपणे दाखवू शकतो तेवढाच तो त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक स्पष्ट करू शकतो, ही बाब हेरून मनपाच्या शाळांमध्ये असलेल्या तटपुंज्या साधनसामुग्रीमध्येही सुरेंद्रगडच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे अंजन घालणारे आहे.
तामिळनाडू मधील रामेश्वरम येथे देशभरातील १ हजार विद्यार्थी जागतिक रेकॉर्ड करणार आहेत. या विक्रमासाठी देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह तयार करीत असून यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या स्वाती मिश्रा व काजल शर्मा या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे. स्वाती आणि काजल ने ‘फेम्टो’ हे उपग्रह तयार केले आहे. हे उपग्रह अंतराळात ३३ हजार ते ३८ हजार मीटर उंचीवर जाउन प्रत्यक्ष वातावरणाची माहिती घेईल व ती माहिती पृथ्वीला पाठविणार आहे. ‘फेम्टो’ या उपग्रहाचे वजन केवळ ५० ते ८० ग्रॅम असून ते अडीच ते ४ सेमीचे असेल. या उपग्रहाच्या निर्मिती संदर्भात दोन्ही विद्यार्थिनींनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. शिवाय नुकतेच त्यांचे ऑफलाईन प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. ‘एसझेडआय वर्ल्ड रेकॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांच्या शंका, प्रश्नांचे वेळोवेळी निराकरण केले जात आहे. एकूणच संपूर्ण मोहिम आता अंतिम टप्प्यात आली आहे. ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांमार्फत तयार करण्यात आलेले १०० उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.
राज्याला दिशा देणारे मनपाचे शिक्षक
नागपूर महानगपालिकेच्या शिक्षकांमध्ये राज्याला दिशा देण्याची क्षमता आहे, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. याबाबत महापौर दयाशंकर तिवारी यांनी एक आठवण नमूद केली. श्री. नंदलाल हे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना त्यांनी ती क्षमता ओळखली. पुढे तेच आयुक्त राज्याचे शिक्षण सचिव झाले. तेव्हा त्यांनी राज्यातील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण बोलविले. विशेष म्हणजे, त्या प्रशिक्षणामध्ये मनपाच्या शिक्षकांनी राज्यातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले, ही आठवणही महापौरांनी सांगितली. ते म्हणाले दोघेही विद्यार्थिंनी नागपूर महानगरपालिकेचा नाव जगात लौकीक करतील, ही मला खात्री आहे.











