नाना पटोले यांचे लोकप्रतिनीधींना आवाहन
भंडारा : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम सुरू केली असून आरोग्य तपासणीच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत उपयूक्त असून या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांना प्रेरीत करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकप्रतिनिधींना पत्राव्दारे केले आहे. हे आवाहन लेखी स्वरूपात जिल्हयातील सर्व लोकप्रतीनिधींना पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये व यापुढील आयुष्यात आपल्याला कोरोना आजाराचे अस्तित्व मान्य करूनच रहावं लागपार आहे. या आजाराची प्रवृत्ती लक्षात घेता आपण त्यापासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे होऊन बसले आहे. बऱ्याच कुटुंबांनी आपल्या आप्तेष्टांना कोरोनाचा संसर्ग होताना पाहिलेले आहे याची खंत त्यांच्या कुटुंबियांच्या मनाला आयुष्यभर लागून राहिल.
यापुढील काळात अर्थव्यवस्थेला हळू हळू रुळावर आपाण्यासाठी दुकानं बाजार, व्यवसाय परत सुरु करण्यावाचून पर्याय नाही. यामुळेच, नागरिक म्हणून आपापली जबाबदार वर्तन केले पाहिजे व आपण करोनाबाबत किती गंभीर आहोत हे सर्व देशाला दाखवून दिले पाहिजे. यात आपल्या प्रत्येकाची भूमिका विशेषतः लोकप्रतीनिधी या नात्याने आपली भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र राज्यात कोविड-19 या आजाराचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. सध्या अनलॉक असल्यामुळे कोरोना काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. व त्या अनुरूप आपल्याला वर्तन करण्यासाठी जनजागृती करावी लागणार आहे.
यासाठी संपुर्ण राज्यात आपण जनजागृती व घरोघरी सर्वेक्षणासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही विशेष मोहिम जिल्हयात राबवित आहोत. ही मोहीम लोकसहभागासाठी आहे. या विशेष सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेत आपण आरोग्य शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण तसेच कोविड संशयित रुग्ण शोधणे यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आपण या मोहिमेतील महत्वाचे लोकप्रतिनिधी असल्यामुळे, आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची अशी ठरणार आहे. आपण गावातील आपल्या सर्व ग्रामस्थांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे व या आजाराला हरविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले. कोविड साथीच्या या लढ्यात आपण सर्वजन मिळून लढूया व कोरोनाला हरवूया. आपण या कामी सर्वतोपरी सहकार्य दयाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मोहिमेमध्ये घर, कुटुंब, परिसर, गाव, शहर आणि राष्ट्राच्या हितार्थ मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुणे, कमीत कमी प्रवास करने याबाबत लोकजागृती करावी. आपण सर्व एकजुटीने, जागरुक राहून, संयमाने आणि धिराने या संकटाचा सामना करूया व माझे कुटुंब माझी जबाबदारी है कर्तव्य पार पाडू या. या मोहिमेमध्ये आपण आपला सक्रीय सहभाग नोंदवून प्रत्येक आरोग्य पथकाला सर्वोतोपरी सहकार्य करावे व ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन नाना पटोले यांनी केले.