Published On : Wed, Aug 5th, 2020

कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्या : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे

मनपा आयुक्तांची झोनल वैद्यकीय अधिका-यांसोबत बैठक

नागपूर: शहरात दररोज कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे, याला प्राधान्य असायला हवे. यादृष्टीने सर्वच झोनल वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्तांनी मंगळवारी (ता.४) सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील ‘कोरोना वार रूम’मध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिडचा संसर्ग रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० जणांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची चाचणी करण्यात यावी. चाचणीत संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्‍ह आल्यास त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला लक्षणे नसल्यास ‘होम आयसोलेशन’मध्ये किंवा ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उपचार करण्यात यावे. याशिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कातीलही व्यक्तीचा शोध घेणे बंधनकारक आहे. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींचे दहा दिवस देखरेख आवश्यक आहे. आय.एल.आय लक्षणे असलेले व्यक्ती कोवीड चाचणीसाठी समोर येत नाही व स्वत:च औषध घेतात किंवा खाजगी दवाखान्यात वा रुग्णालयात जाऊन उपचार करतात व ही माहिती मनपाला देत नाही. परिणामस्वरुप अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळत नाही. हे टाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्यांनी शहरातील मनपाच्या २१ ‘कोव्हिड टेस्टिंग सेंटर’पैकी संबंधित झोनमधील केंद्रात जाऊन चाचणी करावी. सदर रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खाजगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. अशा रुग्णांची माहिती मिळताच संबंधित झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह रुग्णाच्या चाचणीबाबत आवश्यक कार्यवाही करावी. शहरातील कोव्हिडच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून योग्य कार्यवाही करणे हे प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.

आयुक्तांनी सांगितले की, कोव्हिड पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना अतिसौम्य, सौम्य वा लक्षणे नसल्यास यांना स्क्रीनिंगसाठी आमदार निवास येथील केंद्रामध्ये पाठविले जाईल व तपासणी नंतर रुणांना वैद्यकीय सल्ल्यानुसार होम आयसोलेशन, कोव्हिड केअर सेंटर किंवा कोव्हिड रुग्णालयात पाठविण्यात येईल.

आयुक्तांनी सांगितले की, ७ जुलै, २०२० च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. असे आढल्यास साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या झोनमधील खाजगी रुग्णालयांची वेळावेळी तपासणी करणे व त्यांच्याकडून रोजची माहिती घेऊन त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना रोज सादर करावा, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

शहरातील कुठल्याही नागरिकाला काही लक्षणे असल्यास त्यांनी मनपाला तशी माहिती द्यावी. लक्षणे नसताना एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीने घाबरून न जाता मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

Advertisement
Advertisement