Published On : Fri, Jul 24th, 2020

जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिस सज्ज

Advertisement

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती घराबाहेर दिसल्यास पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत.

नागपुरात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महापौरांनी नागपुरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलिसांनी जोरदार तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आली. या बैठकीत दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या बंदोबस्ताचे नियोजन कसे राहील त्यासंबंधाने विचारविमर्श करण्यात आला.

. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दोन ठिकाणी फिक्स पॉईंट आणि दोन ठिकाणी नाकाबंदी लावण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पोलिसांच्या गस्ती वाहनांवरून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना करण्याचे ठरले. शहरात या दोन दिवसात आपत्कालीन परिस्थितीत फिरणारी वाहने आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारी वाहने यांनाच केवळ परवानगी राहणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर दिसल्यास वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. रस्त्यावर घराबाहेर पडणाऱ्या सर्व सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना आणि अत्यावश्यक सेवेकरिता निवडण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांची ओळखपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.