Published On : Sat, Jul 4th, 2020

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्या कृषी विभागाचे आवाहन

Advertisement

नागपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत असून सन 2020-21 पासून तीन वर्षाकरिता लागू करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याकरिता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 व रब्बी हंगामाकरिता 15 डिसेंबर 2020 आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर जिल्हयात खरीप हंगामाकरिता कापूस, तूर, सोयाबीन, भात, ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद या पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रांमध्ये राबविण्यात येणार आहे. तसेच रब्बी हंगामाकरिता गहू (बा), ज्वारी (जि), हरभरा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्राकरिता लागू करण्यात आली आलेली आहे. नागपूर जिल्ह्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तीन वर्षासाठी कार्यान्वीत राहणार आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेधारकच्या व्यतिरिक्त भाडेपट्टीनी शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांकरिता ही योजना ऐच्छिक स्वरुपाची आहे. कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत योजनेत संबंधित बँकेस विमा हप्ता कर्ज रकमेतून कपात न करण्याचे घोषणापत्र भरुन देणे आवश्यक आहे.

खरीप हंगाम 2020-21 साठी भात पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम 41 हजार 750 रुपये असून विमा हप्ता 835 रुपये भरावयाचा आहे. ज्वारी पिकाकरिता विमा सरंक्षित रक्कम 25 हजार रुपये, विमा हप्ता पाचशे रुपये आहे. तूर व भूईमूग पिकाकरिता 35 हजार रुपये असून विमा हप्ता सातशे रुपये आहे. मूग व उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये व त्याकरिता विमा हप्ता चारशे रुपये आहे. सोयाबीन व कापूस पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये असून विमा हप्ता सोयाबीन करिता नऊशे रुपये तरे कापूस पिकाकरिता 2250 रुपये एवढा ठरविण्यात आलेला आहे.

रब्बी हंगाम 2020-21 साठी गहू (बा) पिकाकरिता विमा संरक्षित रक्कम 38 हजार रुपये असून विमा हप्ता 570 रुपये भरावयाचा आहे. ज्वारी (जि) पिकाकरिता विमा संरक्षित 28 हजार रुपये तर विमा हप्ता 420 रुपये आहे. हरभरा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये व त्याकरिता 525 रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे अर्ज, विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्रामार्फत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. विमा अर्जाकरिता सातबारा, आधारकार्ड, बँक खात्यातील तपशील ऑनलाईन जोडणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकरी www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करु शकतील.

योजनेच्या अधिक माहितीकरिता तालुका कृषी अधिकारी, मंडळ कुषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, महसूल विभाग कार्यालय व राष्ट्रीयकृत बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement