Published On : Wed, Jun 10th, 2020

घरांसाठी दीड लाखाची, तर शेतीसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत

Advertisement

निसर्ग चक्रीवादळाने बाधित कुटुंबांना नियमांपेक्षा वाढीव दराने मदत मिळणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई– ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार असून कोसळलेल्या पक्क्या घरांसाठी दीड लाख रुपये, तर बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अडचणीत आलेल्या कोकणासह राज्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन व विविध माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या परिसरात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली.

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पक्क्या घराचे पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना सुधारित दरानुसार दीड लाख रुपये मदत मिळेल.तर पक्क्या किंवा कच्च्या घरांचे अंशत: ( किमान १५ टक्के ) नुकसान झालेल्या कुटुंबांना १५ हजार रुपये मिळतील. नष्ट झालेल्या झोपडीसाठी १५ हजार रुपये मदत मिळेल. घर पूर्णत: कोसळलेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या ७५ टक्के मर्यादेत कमाल १० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयाप्रमाणे कमाल दोन हेक्टरसाठी मदत मिळेल अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणातील तसेच राज्यातील काही भागात नागरिकांचे झालेले नुकसान मोठं आहे. यांना अधिक दराने मदत करण्याची गरज होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) आणि केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) देण्यात येणाऱ्या प्रचलित दरांपेक्षा वाढीव मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं ९ जूनच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे चक्रीवादळाने नुकसान झालेल्या घरांच्या, शेतीच्या, कौटुंबिक साहित्यापोटी संबंधित कुटुंबांना आता प्रचलित नियमांपेक्षा अधिक दराने मदत मिळणार आहे.

‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार सध्या पक्क्या घराचे पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना ९५ हजार १०० ते १ लाख १ हजार ९०० रुपये मदत मिळत होती. नवीन निर्णयानुसार या कुटुंबांना आता दीड लाख रुपये मिळतील. कच्चा किंवा पक्क्या घरांचे अंशत: ( किमान १५ टक्के ) नुकसान झालेल्या कुटुंबांना पूर्वी ६ हजार रुपये मिळत होते त्यांना आता १५ हजार रुपये मिळतील. जर कुणाची झोपडी नष्ट झाली असेल तर पूर्वी ६ हजार रुपये मिळत होते, त्यांनाही आता १५ हजार रुपये मिळतील. घर पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांसाठी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे एकूण १० हजार रुपये मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या ७५ टक्के मर्यादेत कमाल १० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी पूर्वी १८ हजार रुपये प्रतिहेक्टर, दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत मिळत होते. त्याऐवजी आता प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयाप्रमाणे कमाल दोन हेक्टरसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबे निश्चित करण्यात येतील. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मदतीच्या या प्रक्रियेत संपूर्ण पारदर्शकता असेल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

चक्रीवादळामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वीजेचे खांब कोसळले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वादळाने बाधित असलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील बाधित शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी ५ लिटर केरोसीन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement