Published On : Wed, Jun 10th, 2020

शरद पवार आज रत्नागिरी जिल्ह्यात;’निसर्गा’ च्या तडाख्यातील मंडणगड, दापोलीतील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी.

Advertisement

मंडणगड तालुक्यातील अत्यंत दुर्गम वेळास, बाणकोट, वेसवी गावांना दिल्या भेटी;नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधताना शरद पवार झाले भावूक…

कोकणातील शेतकरी कोणत्याही सुलतानी व अस्मानी संकटाना घाबरणारा नाही;दिला विश्वास.

रत्नागिरी : – ‘निसर्ग’ चक्रीवादळाने हानी पोचलेल्या कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असून मंगळवारी रायगड जिल्हयातील नुकसानीची पाहणी करुन आज रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली या तालुक्यातील गावातील नुकसानीची पाहणी केली.

सकाळी ९.३० वाजता शरद पवार यांनी मंडणगड तालुक्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या वेळास, बाणकोट, वेसवी, केळशी तसेच बाणकोट-वेळास गावाचे सरपंच प्रल्हाद तोडणकर, केळशी गावाचे सरपंच माया रेवाले यांच्याशी यावेळी चर्चा केली तर बाणकोट व मांदिवली, हर्णे
या गावांना भेट देत पाहणी केली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.

कोकणातील शेतकरी हा कोणत्याही सुलतानी व अस्मानी संकटाना घाबरणारा नाही अनेक संकटे पचवून तो वेळोवेळी ठामपणे ताठ कण्याने उभा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त कोकणी माणसाला सरकार मदत करेल असा धीर देत शरद पवार यांनी नुकसानीबाबत प्रत्यक्ष नागरीकांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आज सकाळी ९.३० वाजता खासदार शरद पवार यांचे मंडगणड शहरात आगमन झाले. त्यांच्यासोबत रायगड – रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, आदी उपस्थित होते.

मंडणगड शहरातून तालुक्यातील व जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या वेळास बाणकोट, वेसवी व अन्य गावांना भेट देत खासदार शरद पवार यांनी प्रत्यक्षात निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसलेल्या भागाची पाहणी केली.

स्थानिक नुकसानग्रस्त लोकांशी संवाद साधताना व चर्चा करताना खासदार शरद पवार हेसुध्दा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोणत्याही परिस्थितीत कोकणातील कोणताही नुकसानग्रस्त माणूस अथवा कुटुंब शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देत नुकसानग्रस्त नागरीकांना धीर देण्याचा शरद पवार यांनी यावेळी प्रयत्न केला.

वेळास गावातील नुकसानग्रस्त नागरीकांनी शरद पवार यांच्याशी बोलताना आमच्या मुलाबाळाप्रमाणे जतन केलेल्या बागायती पुर्णत: उन्मळून नष्ट झाल्या आहेत. आमचे उत्पन्नाचे स्त्रोत कायमचे हिरावले गेल्याने आमच्या भवितव्याचा शासनाने तात्काळ विचार करावा असे सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेत विशेष सुचनाही केल्या. या दौऱ्यात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, तहसिलदार नारायण वेंगुर्लेकर, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे आदी उपस्थित होते.