Published On : Wed, Mar 11th, 2020

महिलेचा रेल्वे गाडीसमोर आत्महत्येचा प्रयत्न

Advertisement

– रेल्वेस्थानकावर खळबळ,रेल्वे रुळावर घेतली उडी

नागपूर: रंगाच्या रंगात रंगुन जाण्यासाठी शहर आतुर असताना एका महिलेने रेल्वे रुळावर उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकोपायलटने वेळीच गाडी थांबविली. त्याच वेळी एका तरूणाने महिलेला फलाटावर ओढले. जीवाचा थरकाप उडविणारी ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मोमिनपुरा निवासी ५५ वर्षीय निलम (काल्पनिक नाव) सोमवारी दुपारी १४.४५ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर आली. फलाट क्रमांक ६ वर मुंबई एन्डच्या दिशेनी ती गेली. त्याच वेळी २२६२० तिरुनवेल्ली-बिलासपूर एक्स्प्रेस धड धड करत फलाटावर येत होती. प्रवासी गाडीच्या प्रतिक्षेत होते. निलमही प्रवाशांसह फलाटावर थांबली होती. गाडी स्टेशनच्या आत पोहोचली. जवळ येत असतानाचे पाहून निलमने रेल्वे रुळावर उडी घेतली. लोकोपायलट आर.पी. सरदार, सहायक लोकोपायलट डी. मंडल यांच्या लक्षात येताच त्यांनी ब्रेक लावला. काही वेळातच गाडी थांबली तेव्हा निलम आणि गाडी यांच्यातील अंतर केवळ एक ते दिड फूटाचे होते. त्याच वेळी जरीपटका निवासी राम पंजवानी हा तरुण वडिलांना सोडायला आला असता त्याने निलमला मदतीचा हात देवून फलाटावर घेतले.

माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक अतूल श्रीवास्तव आणि सतीश ढाकणे यांनी सुरक्षा व्यवस्थेला सूचना दिली. त्यानुसार लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय पटले घटनास्थळी पोहोचले. महिलेला ताब्यात घेवून सखोल चौकशी केली. निलमला एक मुलगा आहे. ती तणावात असताना घरून निघाल्याचे समजते. काही वेळानंतर ती शांत होताच लोहमार्ग पोलिसांनी तिला घरी पोहोचविले.

दरम्यानआरपीएफ निरीक्षक आर. आर. जेम्स, एएसआय चंद्रभान अहिरवार, एस. पी. qसग फलाटावरून जात असताना त्यांनी महिलेची आस्थेनी विचारपूस करून तिला दिलासा दिला. गाडीचे गार्ड ए.के. चौधरी यांनीही कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला.

काहीच झाले नाही
रेल्वे स्थानकावर आत्महत्या करण्याच्या विचाराने कुणी येतो आणि तसा प्रयत्नही करतो. लोहमार्ग पोलिस त्या महिलेची विचारपूस करून तिला घरी पोहोचवून देतात. मात्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी घटनेसंदर्भात विचारपूस केली असता असे काहीच झाले नसल्याचे सांगण्यात आले. नंतर ही तर आमच्यासाठी अतिशय किरकोळ बाब असल्याचेही बोलले जाते.

Advertisement
Advertisement
Advertisement